*कन्या महाविद्यालय मिरज येथे ‘बदलता भारतीय समाज’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शनतून सामाजिक परिवर्तनाचा वेध*
मिरज : द न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे ‘बदलता भारतीय समाज’ या विषयावर पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
प्रदर्शनात विद्यार्थिनींनी भारतीय समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक बदल मांडले. कुटुंबव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, तंत्रज्ञान, शहरीकरण, ग्रामीण परिवर्तन, सामाजिक माध्यमे, बदलती जीवनशैली, सामाजिक समता, पर्यावरण आणि युवकांमधील सामाजिक संबंध या विषयांवरील पोस्टर सादर करण्यात आले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. गंगाधर चव्हाण यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. जागतिकीकरण, तंत्रज्ञान, शिक्षण, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे सामाजिक संस्था, मूल्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था व सामाजिक संबंधांमध्ये बदल होत आहेत. परंपरा आणि आधुनिकतेच्या परस्परसंवादातून घडणाऱ्या या परिवर्तनाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थिनींनी संयुक्त कुटुंबव्यवस्थेपासून अणुकुटुंबाकडे होणारे संक्रमण, डिजिटल तंत्रज्ञानामुळे बदलणारे सामाजिक संबंध, महिलांचा शिक्षण व रोजगारातील वाढता सहभाग, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल आणि युवकांची बदलती जीवनशैली हे विषय प्रभावीपणे मांडले.
या उपक्रमातून विद्यार्थिनींना निरीक्षण, चिकित्सक विचार, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि संवादकौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमास भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ. विनायक पवार तसेच समाजशास्त्र विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



















