कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची मिरज पंचायत समितीला अभ्यास भेट
मिरज येथील कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्या 83 विद्यार्थिनींनी मिरज पंचायत समिती कार्यालयाला शैक्षणिक अभ्यास भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थिनींनी ग्रामीण विकासाच्या योजना, पंचायत समितीचे कार्यक्षेत्र, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रशासकीय रचना याबाबत सखोल माहिती मिळवली.या अभ्यास भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गंगाधर चव्हाण व राज्यशास्त्र विभागाचे प्रा. अभिनव औरादकर आणि डॉ. शबाना हळंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या अभ्यास भेटीला गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना पंचायत समितीचे कार्य, ग्रामपंचायतींसोबतचे समन्वय, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी आणि बांधकाम या विभागांचे कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या वेळी गट शिक्षण अधिकारी रियाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी धडस व विजयकुमार पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय थोरवे व नेहा सभासद, महिला व बालविकास अधिकारी विद्या लाटणे, विस्तार अधिकारी (आरोग्य) विजय संकपाळ, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद शेंडगे यांनी आपल्या विभागांबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.तसेच कृषी विभागाच्या श्रद्धा पवार, तालुका व्यवस्थापक प्रशांत शिंदे, घरकुल योजना विभागाचे अध्यक्ष संतोष इंगळे व सहायक प्रशासक अधिकारी छोटू पवार उपस्थित होते.मिरज पंचायत समिती ही तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविण्याचे, विकास कामांचे नियोजन करण्याचे आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करते.या अभ्यास भेटीद्वारे विद्यार्थिनींना पंचायत समितीचे वास्तव स्वरूप, शासन-प्रशासनातील समन्वय, तसेच विकास योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहण्याची मौल्यवान संधी मिळाली.
No comments:
Post a Comment