जागतिक आरोग्य दिन : नैराश्य
जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
जगात विकसीत आणि विकसनशील अशा दोन भागांखेरीज मागास असणारे देश देखील आहेत. प्रत्येक देशाची आरोग्य समस्यांवर खर्च करण्याची तयारी आणि आर्थिक क्षमता यात देखील मोठे अंतर असल्याचे आपणास दिसते. परंतु तज्ज्ञ मार्गदर्शनात अनेक देशातील अनेक समस्या कमी झाल्या. याचं उत्तम उदाहरण अर्थात भारतातील पोलिओमुक्ती आहे.
हृदयाच्या स्पंदनानुसार अर्थात पल्सनुसार संपूर्ण देशात एक दिवस निवडून नवजात शिशू पासून 5 वयाच्या बालकापर्यंत पोलिओ डोस देण्याच्या संकल्पनेला 1995 साली सुरूवात झाली आणि आज 20 वर्षांनी आपण पोलिओमुक्त झाल्याचे स्वप्न वास्तवात आणू शकलो आहोत. बदलत्या काळानुसार आरोग्य समस्या आणि त्यांच्या फैलाव होताना दिसत आहे. प्रचंड प्रतिकारशक्ती असणारे विषाणू (वायरस) आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी धोरण असणे त्यामुळेच अत्यंत आवश्यक झाले आहे. असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणू बाधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मोडून काढत असतो. परिणाम स्वरुप एडस् चे आव्हान गेल्या दोन दशकांपासून जगातील अनेक देशांपुढे आहे.
बर्ड फ्लू तसेच स्वाईन फ्लू आदी संसर्गजन्य आजार गेल्या दशकात समोर आले आहे. त्यांचा अटकाव रोखण्यासाठी देशांतर्गत प्रवासी वाहतुकीवर बंधने घालण्याची वेळ अनेक देशांवर आली. प्राण्यांची वाहतूक बर्ड फ्लूमुळे बंद करावी लागली. प्राणीमात्रात या सोबतच “मॅड काऊ” आजार समोर आला. मध्यंतरी आफ्रिकेत झालेला “ईबोला” किंवा भारतात चिकन गुणिया आणि डेंग्यूचा प्रसार अनेकांचे प्राण घेणारा ठरला. या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अस्तित्व आणि कार्य यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. यावर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठीची थीम म्हणून ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व देश मिळून साधारण 700 कोटीपर्यंत लोकसंख्या आहे. यातील साधारण 35 कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. तशी मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी ही बाब असली तरी यावर उपाय करणे शक्य आहे. नैराश्यातून जाणारा माणूस आत्महत्येच्या वाटेवर असतो. त्यामुळे हा विकार अधिक गांभीर्याने आपण बघितला पाहिजे. नैराश्याने ग्रस्त असलेली व्यक्ती ओळखणे अवघड नसते मात्र धकाधकीच्या या जीवनशैलीत आपण स्वत:कडेही पूर्ण लक्ष देत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे इतकरांकडे लक्ष देणे ते देखील त्यांची समस्या जाणून त्यात मदत करणे हे जणू कल्पने पलीकडले आहे.
नैराश्य येण्याची कारणे अनेकदा व्यक्तीच्या संगोपनात असतात. घरात हल्ली चौकोनी कुटुंबे दिसतात, त्यातही पालकांचे लक्ष एकावर अधिक असेल तर त्यातून दुसऱ्याच्या मनात कमीपणाची भावना घर करते. ही नैराश्याची पायाभरणीच म्हणता येईल. त्यामुळे पालकांनी संगोपनात मुला-मुलीत भेदभाव ठेवणे थांबविले पाहिजे, ही काळाची गरज आहे.
लहानपणी होणारी मारहाण, शिवीगाळ आणि सततची टोचून बोलणी आत्मविश्वास कमी करतात. त्यातून प्रवास नैराश्याकडेच होतो. लहान वयात लैंगिक अत्याचार झालेली मुले-मुली नंतर आयुष्यात सावरत नाहीत. त्यांचीही वाट नैराश्याकडे जाणारी असते.
मोठ्या व्यक्तीत सतत विपरीत परिस्थितीत काम करावे लागणे, आर्थिक संकटात सापडणे, आपण इतरांबरोबर स्पर्धेत टिकू शकत नाही. याची सतत खंत वाटणे. इतर सहकारी व वरिष्ठांकडून मिळणारी सातत्यपूर्ण अपमानजनक वागणूक त्यासोबतच आपण इतरांच्या लेखी शून्य आहोत, जगण्याच्या लायकीचे नाही असे विचार सतत करणारी व्यक्ती नैराश्यात जाते आणि वेळीच नैराश्यावर उपाय न झाल्यास आत्महत्या करते असे दिसून आले आहे.
नैराश्य हे मनाचा विचार आणि त्याच्याशी निगडीत असले तरी त्यात बदल शक्य असतो. यासाठी काऊन्सिलींग अर्थात समुपदेशन हा मार्ग आहे. आपला देश योग आणि अध्यात्माशी जोडलेला आहे. ती भारताची संपूर्ण जगभरात पहिली ओळख आहे. अध्यात्मातून मनात आलेले निराशाजनक विचार दूर होऊ शकतात.
परिस्थिती बदलली पाहिजे, असे नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला वाटत असते. प्रत्यक्षात बदल हा व्यक्तीच्या विचारात आणि आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात येण्याची गरज असते. नैराश्यात असलेल्या व्यक्तीला मानसिक पातळीवर जाणून घेऊन कुटूंबातील प्रत्येकाने त्याच्या मित्रांनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी आपल्या वागणुकीतून ‘तू’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असा कळत न कळत दिलेला संदेश आणि जाणिव यातून त्या व्यक्तीला नैराश्यापासून दूर ठेवता येते.
अतिनैराश्याची स्थिती व्यक्तीला झटकन आत्महत्या करायला उद्युक्त अरते. परीक्षेत पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची कुवत यात अंतर असू शकतं. मात्र अशा स्थितीत मारहाण होईल किंवा घराबाहेर हाकललं जाईल या भीतीपोटी आत्महत्या होतात. प्रेमभंग ही एक त्यातलीच बाब. यातूनही चटकन अतिनैराश्य येऊन आत्महत्या करणारे अनेक प्रेमी युगूल आपण बघतो. बलात्कार झालेल्या मुलींपैकी अनेक जणींनी मृत्युला कवटाळलं हे आपण वृत्तपत्रात वाचतो.
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती वेगळी, त्याचे गूण वेगळे मात्र सततची हेटाळणी आणि दुर्लक्ष याला समाज जबाबदार आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आदराने एकमेकांना साथ दिली तर नैराश्यातून जाणारे बळी कमी होतील. वैद्यकीय उपचार करता येतील. परंतु मानसिक स्थिती मूळपदावर आणने व व्यक्तीला जगण्याचा मार्ग दाखवणे ही समाजाचीच जबाबदारी आहे.
सतत एकाकी राहणे, जेवन न करणे किंवा खूप जेवण करणे, त्रागा करणे, सतत चिडचिड करणे, विचारमग्न व अबोल राहणे, चिंताग्रस्त राहणे, ही नैराश्याची काही लक्षणे आहेत. आपल्या परिसरात असं कुणी आहे का हे तपासून त्या व्यक्तीला मदत करा असा संदेश या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण देऊ अर्थात दोन वाक्यात म्हणता येईल “आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या.”
लेखक - प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
👍
ReplyDeletevery nice Thanks to share
ReplyDelete