Monday, January 10, 2022

समाजातील वाढत्या आत्महत्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास

 भारतीय समाजातील वाढत्या आत्महत्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास . 


प्रा. गंगाधर बा. चव्हाण

कन्या महाविद्यालय मिरज

chavangangadhar7@gmail.com

९७६६११५००८


प्रस्तावना: 

आज भारतीय समाजातील वाढत्या आत्महत्या ही अत्यंत धोकादायक अशी सामाजिक समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आहे . वाढत्या आत्महत्या हे चिंतेची गोष्ट आहे . आज आपण खूप सारी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती केली आहे पण आपल्याला अजूनही मानसिक शांती , निराशा , चिंता ह्यातून बाहेर पडून सामाजिक समतोल राखता आलेला नाही. हे आत्महत्येच्या दरावरून अपल्याला दिसून येते. आज व्यक्तींचा कल हा आधुनिकतेकडून चंगळवादाकडे वाढलेला दिसून येतो आहे. त्यामुळे समाजातील नागरिक विशिष्ट दबावाच्या वातावरणामध्ये जीवन जगताना दिसून येत आहेत. अनेकांना अनेक प्रकारचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, संस्कृतिक ताण-तणाव आहेत, त्यातून व्यवस्थित बाहेर पडता न आल्यामुळे जीवन संपवण्याची मानसिकता मानवी समाजात दृढ होताना दिसत आहे. होणारा ताण असह्य न झाल्यामुळे व्यक्ती आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे अमूल्य जीवन संपवत आहे. आत्महत्या ह्या एका विशिष्ट गटाच्या/समुदायाच्या होत नाहीत तर त्या सर्व समाजामध्ये होताना दिसून येतात. त्यात स्त्री-पुरुष आणि विविध वयोगटातील व्यक्ती या सर्वांचा समावेश ह्या आत्महत्येच्या सामाजिक समस्यांमध्ये होताना दिसत आहे.


गृहीतकृत्य


१) समाजातील बहुतांशी व्यक्ती ह्या विविध प्रकारच्या मानसिक आजारामुळे आत्महत्या करतात.


२) व्यक्तींना जीवन जगताना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो, हे चढ-उतार सहन न झाल्या मुळे व्यक्ती आत्महत्येसारख्या निर्णयप्रत पोहोचतो.


उद्दिष्टे

१) भारतीय समाजातील आत्महत्यांची स्थिती व कारणे समजून घेणे.


२) एमिल दुर्खीम या विचारवंतांचा आत्महत्येचा सिद्धांत पडताळून पाहणे.


संशोधन पद्धती


सदरील संशोधन करण्यासाठी प्राथमिक व दुय्यम तथ्य संकलन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे . त्यात मुलाखती, निरीक्षण, सर्वेक्षण , संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रांमधील लेख, सरकारी कार्यालयांचे अहवाल ,सामाजिक संस्थांचे निरीक्षणे, समाज माध्यमातून मिळालेली माहिती याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे.


सैद्धांतिक दृष्टीकोन


एमिल दुर्ख़ाइम यांनी त्यांच्या १८९७ च्या lee suicide नावाच्या ग्रंथात आत्महत्या संबंधी विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते आत्महत्या ही एक सामाजिक घटना असून ती समाजाच्या विघटनातून निर्माण होते. आत्महत्या हे एक सामाजिक सत्य असल्यामुळे आत्महत्येचे विश्लेषण सामाजिक कारणांच्या संदर्भातच केले पाहिजे असे मत दुर्खीम यांचे आहे. जोपर्यंत गरजा व साधने यांचा मेळ बसत नाही तोपर्यंत व्यक्ती सु:खी असत नाही, दुःखी व्यक्ती आत्महत्येचा मार्ग जवळ करतात. आजच्या औद्योगिक समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक रचनेत बदल, सामाजिक एकतेचा व नीतिमत्तेचा ऱ्हास, व्यक्तिस्वातंत्र्याची वाढ, असंतुलित सामाजिक संबंध आणि व्यक्तिवादी विचारसरणी यासारखी सामाजिक कारणे आत्महत्येला जबाबदार असतात, असे एमिल दुर्खीमचे मत आहे. त्यामुळे त्याने आत्महत्या ही सामाजिक कारणांतूनाच घडते असे ठामपणे सांगितले. दुर्खीमने आत्महत्येचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. 

१) आत्मकेंद्री अथवा अहंमवादी आत्महत्या: समाजातील प्रत्येक व्यक्ती आपला अहंकार जपण्याचा प्रयत्न करते हा अहंकार स्तुतीने सुखावतो आणि निंदेने दुखावतो. एकात्म समाजात व्यक्तीच्या अहंकारावर विविध सामाजिक नियमाद्वारे काही बंधने घातली जातात. भावनात्मक सहानुभूती दाखवली जाते. ह्यास्थितीत व्यक्ती समाजापासून दूर जाते आणि आत्महत्येचा मार्ग जवळ करू लागते. आधुनिक समाजात आत्मकेंद्री आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते कारण हा समाज व्यक्तिवाद, स्वार्थी वृत्ती आणि व्यक्तिनिरपेक्षसंबंध इत्यादींवर आधारलेला आहे. हीच अहंमपणाची भावना व्यक्तीला संपविण्यास कारणीभूत ठरते. 

२) परार्थवादी किव्हा परहितवादी आत्महत्या: दुसऱ्याच्या हितासाठी केलेली आत्महत्या म्हणजे परार्थवादी आत्महत्या होय. या प्रकारात व्यक्तीपेक्षा समाजातील विशिष्ट घटकाला अधिक महत्त्व प्राप्त होते. जेव्हा व्यक्तीवर पूर्णता गटाचे वर्चस्व असते तेव्हा व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्या पेक्षा समाजासाठी आत्मसमर्पण करते, त्यास परार्थवादी आत्महत्या असे म्हंटले जाते.


३) प्रमाणकशून्य अथवा निराशावादी आत्महत्या: दुरखिमच्या मते जेव्हा समाजामध्ये आकस्मिक किंवा अचानक बदल घडून येतात आणि व्यक्तींना अशा बदलाशी समायोजन साधता येत नाही, तेव्हा त्यांच्याकडून प्रमाणकशून्य आत्महत्येचा मार्ग अवलंबिला जातो.


मूल्यमापन: 


एमिल दुरखिंमच्या वरील विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात येते की व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी समाज हा घटक मजबूर करतो व काही वेळास व्यक्ती स्वतःमधील कमतरता किंवा अपयश पचवण्यासाठी आत्महत्या करत असतो. भारतीय समाजाच्या बाबतीत पहिले तर व्यसनाधीनता, बेरोजगारी, गरिबी, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला योग बाजारभाव न मिळणे, सोशल मीडियाचा अतिवापर, निराशा, मानसिक ताण-तणाव, शारीरिक व्याधी, गुन्हेगारी, कुटुंबासोबत व समाजासोबत योग्य समायोजन न साधता आल्यामुळे होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्या विविध कारणांमुळे समाजात आत्महत्या वाढत असलेल्या दिसून येतात.


उपाययोजना: 

समाजातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे, त्या पुढीलप्रमाणे. 

१) व्यक्तीचा मानसिक ताण- तणाव ओळखून समुपदेशन कारणे आवश्यक आहे.

२) निराशे मध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे प्रबोधन करून त्या व्यक्तीचे मन इतर ठिकाणी कसे रमावता येयील ह्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

३) सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींना त्याचे फायदे-तोटे व्यवस्थित समजावून सांगून त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे.

४) अपल्पभुधरक शेतकरी आणि शेतमजुर यांना आर्थिक लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. 

५) बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्व स्तरावर सकारात्मक प्रयत्न केला जायला हवा.

६) कुटुंबात, समाजात व मित्रांच्या गटांमध्ये एकमेकाला समजून घेऊन व्यक्तिमत्वविकास करणे गरजेचे आहे. 

७) व्यक्तींनी एकमेकाच्या सुख, दुःखात एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे. जेणेकरून व्यक्ती एकटा पडणार नाही, ह्याची काळजी घ्यावी.


निष्कर्ष: 

१) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेती समस्या जबाबदार आहेत.

२) आत्महत्यांसाठी सामाजिक परिस्थिती जबाबदार असल्याचे दिसते.

३) ४०% आत्महत्या ह्या मानसिक आजारमधुन घडून येतात.

४) स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये आत्महत्येची संख्या जास्त आहे.

५) आत्महत्येसाठी मानसिक ताण-तणाव जबाबदार असलेले दिसून येतात.

६) व्यक्तींची सामाजिक स्थिती आणि आर्थिक स्थिती आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे दिसून येते.


संदर्भ सूची: 

 Ahuja, R. (2014). Social problems in India. Jaipur: Rawat Publications.


Thorat, S. (2009). Dalits in India: Search for a common destiny. New Delhi: SAGE Publications India Pvt.


सुधा काळदाते (२००९) भारतातील समाज प्रश्न आणि समस्या, विद्या बुक बुक पब्लिकेशन, औरंगाबाद.


डॉ. राम आहुजा, सामाजिक समस्याएँ और सामाजिक परिवर्तन, मीनाक्षी प्रकाशन जयपुर (राजस्थान)


कुलकर्णी पी. के.(१९९८),भारतातील सामाजिक समस्या, नागपुर विद्या प्रकाशन.


आगलावे प्रदीप (२००९), भारतातील समाज प्रश्न आणि समस्या, नागपूर श्री.साईनाथ प्रकाशन.


संघावे विलास


(१९९१),भारतातील सामजिक समस्या, कोल्हापूर पॉप्युलर प्रकाशन.

No comments:

Post a Comment