नास्तिक बनणं सोपं नसतं..!
मी अमुक धर्माचा आहे असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा मानसिक दृष्ट्या त्याला त्या धर्माचा आधार वाटत असतो. शिवाय तो कुठल्यातरी समूहाची जोडून आहे अशी भावना मनात राहिलेली असते. त्यामुळे कोणीतरी आपल्याला मदत करणार आहे, आपल्या पाठीशी आहे म्हणजे त्या धर्माचे देव, अशी समजूत त्याला उपयोगी पडत असते. पण ही समजूत आंधळी तर असतेच पण तात्पुरती देखील असते.
अमुक एका धर्माचा म्हटले की त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटतो आणि तो धर्माचाही अभिमान बाळगू लागतो. पण हा अभिमान आंधळा असल्यामुळे तो त्याला कट्टर बनण्याकडे घेऊन जातो. मग त्या त्याच्या धर्माने त्याला कितीही फसवले, लुटले किंवा वापर करून घेतला तरीही त्याला कळत नाही. उलट हे धार्मिक कृत्य आहे असे म्हणून तो ते अखंड करत राहतो.
जेव्हा या सर्व गोष्टी एखाद्याच्या लक्षात येतात तेव्हा तो बंड करतो आणि या धार्मिकतेचा त्याग करतो. तिथून नास्तिकतेची सुरुवात होते. धर्माला आणि देवाला नकार देऊन नास्तिकता जन्माला आली तरीही नकारातून आलेली नास्तिकता ही आयुष्यभर टिकवून ठेवणे फार कठीण असते. कारण एका नकारातून आपण बाहेर पडलो तरी पुढे जगायचे कसे हा प्रश्न समोर उभा राहतो. त्याचे कारण असे की, आधारासाठी ना देव असतो ना धर्म असतो. मानसिक आधार कसा उभा करायचा यासाठी त्याची लढाई सुरू होते. या लढाई साठी त्याला समाजाचे कोणतेही पाठबळ नसते.
धार्मिक माणूस हा धर्माने दिलेले आदेश पाळतोच असे नाही. त्यामुळे त्याला धार्मिक वागणे म्हणजेच नीती व मूल्याने वागणे जमतेच असे नाही. पण नास्तिकता स्वीकारल्यावर पहिले लक्ष जाते ते आपल्या वागण्यावर. आणि आपले वागणे बरोबर की चूक याचा सतत विचार करायला सुरुवात होते. कारण देव नाही, धर्म नाही, मग आपण वागायचे कसे असा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि या प्रश्नाचे उत्तर असे मिळते की विवेकाने वागल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात धार्मिक बनण्याऐवजी विवेकी बनणे घडू लागते. आणि मग अशावेळी आपण कसे वागायला हवे याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो.
जर नास्तिकाला कसे जगायचे याविषयीचं तंत्र सापडलं तर तो विवेकवादी व्हायला सुरुवात होते. हे तंत्र म्हणजे, लॉजिक वापरणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाणवणे. लॉजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन पद्धतींचा खूप मोठा आधार नास्तिकांना मिळतो. तेव्हा तो पूर्णपणे देव आणि धर्म यांना नाकारतो. कारण देव हा अस्तित्वात नाही याचे भान येते. देव नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपले जगणे सुसह्य करतो हे लक्षात येते. धर्म नव्हे तर नीतीमूल्यं आणि विवेक आपलं जगणं शांततापूर्ण बनवतो हे अनुभवाला येते. धर्माशिवाय आपण चांगली व्यक्ती म्हणून जगू शकतो हे जमू लागते. एवढेच नव्हे तर कोणत्याही गटाचा, समुदायाचा, जातीचा, संबंध नसल्याने सर्व माणसे ही एकच आहेत असे लक्षात येऊ लागते. त्यामुळे सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत जातात.
लॉजिकचा आधार असल्याने जेव्हा केव्हा मानसिक संकटे येतील तेव्हा त्यांना सहजगत्या तोंड देता येते आणि या संकटांना ओलांडून नव्या नव्या गोष्टी हातून घडू लागतात. अशा समजुती निर्माण होतात की ज्यामुळे आयुष्याची बांधणी नीटनेटकी होऊ लागते. पूर्वीच्या समजुती धार्मिक व दैववादी मानसिकतेमुळे गोंधळलेल्या आणि विस्कटलेल्या असतात. पण इथे आपल्या स्वतःला ओळखायला आपण शिकतो. आणि जगण्यांमधील अनेक नवीन हेतू दृष्टीस पडू लागतात.
धार्मिकांना असे सांगितले जाते की धर्माची शिकवण जर त्यांनी पार पाडली नाही तर ते नरकात जातील. या भीती दाखवण्याच्या तंत्रामुळे धार्मिक व्यक्ती सतत मानसिक दबावाखाली राहते आणि तिच्यामध्ये काळजी, चिंता, अज्ञात शक्तीची भीती घर करून राहते. शिवाय धार्मिक लोक विशिष्ट अशा धर्मगुरूंच्या देवांचे-नियमांचे गुलाम बनून राहतात. कारण धर्मगुरुला त्याच्या धर्माच्या समजूतीत सर्वांना टिकवून ठेवायचे असते. सातत्याने या धार्मिकांवर जेव्हा धर्माचे सर्व नियम पाळण्याची अघोषित सक्ती निर्माण होते तेव्हा त्यांच्यामध्ये अस्थिरता, अस्वस्थता आणि परावलंबित्व निर्माण होते.
नास्तिकता जेव्हा स्वीकारायला सुरुवात होते तेव्हा अर्थातच खूप मोठा ताण मनात निर्माण होतो. वर्षानुवर्षे आणि लहानपणापासून आपण स्वीकारलेल्या समजुती सोडून देणे इतके सोपे नसते. सोडून देताना भीती देखील दाटून येत राहते. पुढे आपले आयुष्य नीट जाईल की नाही याविषयी साशंकता निर्माण होते. नवनवीन गोष्टींचा शोध लागल्यामुळे इतकी वर्ष आपण वाया घालवली याची खंत दाटून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्यापासून वैचारिक फारकत घ्यावी लागते. कारण आपण आपल्या विषयीच्या, इतरांविषयीच्या आणि जगाविषयीच्या समजूती व संकल्पना बदलून टाकायला सुरुवात केलेली असते.
देवाच्या विरोधात बोलायचं नाही आणि धर्माला प्रश्न विचारायचे नाही अशी कडेकोट समजूत धार्मिकात निर्माण झाल्यामुळे ते कधीही प्रश्न विचारण्याचे धाडस करत नाहीत. तीच सवय लागल्याने इतर व्यवहारात देखील ते प्रश्न विचारत नाहीत आणि एक प्रकारे भोळसटपणा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो. ज्याला श्रद्धाळूपणा म्हणतात. पण नास्तिकता स्वीकारल्यावर मात्र प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य येते. उलट-सुलट तपासणी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि अचूक उत्तर निर्माण करण्यामध्ये हातखंडा तयार होतो. नास्तिकता स्वीकारल्याने निस्वार्थपणा, दयाबुद्धी आणि एकमेकांना मदत करणे या मूल्यांविषयी सजगता निर्माण होते. धार्मिक लोक स्वतःच्या धर्माचाच फक्त विचार केल्यामुळे स्वार्थी बनतात. इतर धर्मांविषयीची दयाबुद्धी कमी राहते किंवा नष्ट होते. आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना मदत करणे याविषयी शून्य भाव तयार होतो. यातून धार्मिक तेढ, जातीय तेढ सातत्याने समाजात वर्षानुवर्षे टिकून राहिलेली आहे.
नास्तिक व्यक्तींनी मूल्यांना महत्त्व दिल्यामुळे ते कोणताही रंग, भगवा-हिरवा-निळा-पांढरा मूल्यांना चढवत नाहीत. कारण मूल्यं ही मूल्यं असतात. एवढेच नव्हे तर आपल्या वागण्यामध्ये काही दोष आहेत का इकडेही नजर वळू लागते. आणि आपल्या विचारातील दोष हुडकून काढायला सुरुवात होते. धार्मिक व्यक्ती सहसा स्वतःला जबाबदार अशावेळी धरत नाही, तर दैववादामुळे किंवा दुसऱ्यामुळे माझे नुकसान होते असे म्हणत राहते. नास्तिक मात्र आपल्या चुकांना आपण जबाबदार आहोत इथून सुरुवात करतो. त्यामुळे त्याच्या वागण्यातील दोष किंवा कॉग्निटीव्ह डिस्टॉरशन्स त्याच्या लक्षात येतात व नेमकेपणाने ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे इथे देवाचा धावा नसतो किंवा कुठल्यातरी महाराज-बुवाकडे जाऊन स्वतःला दुरुस्त करणे नसते. स्वतःला स्वतःच दुरुस्त करणे ही क्षमता निर्माण झालेली असते.
नास्तिकांना वास्तव जगणे काय असते हे समजू लागते. कारण वास्तव नसलेल्या देवाचा त्याग केलेला असतो. धर्माच्या कहाण्या आणि उपदेश यांच्या अवास्तवपणाचे भान येऊ लागते. रियालिटी किंवा वास्तवात जगणे नास्तिकाला समजू लागते. आणि आजूबाजूचे वास्तव किती दाहक वा उपयोगी आहे याचा सारासार विचार जमू लागतो. धर्माचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे सामाजिक आणि विश्वाची अस्थिरता असते. या अस्थिरतेमुळे माणूस मानसिकदृष्ट्या असहाय बनतो. त्यामुळे आधारासाठी तो देवधर्म करत राहतो. पण ही अनिश्चितता स्वीकारण्याचे धैर्य नास्तिक बनल्यामुळे येते.
नास्तिक होत जाताना झगडा करावा लागतो तो आपल्या स्वतःची प्रतिमा कशी असायला हवी याविषयी विचार करणे याच्याशी...
आपले नातेसंबंध निरामय कसे राहतील याच्याशी...
आपल्या समजूती निरोगी कशा बनतील याच्याशी... आणि
आपले मानसिक स्थैर्य कसे राखता येईल याच्याशी!!
हा झगडा निरंतरपणे नास्तिक करत राहतो. तो अवघड असला तरी तो साध्य असतो. आणि जर आपण ते साध्य केले तर नास्तिकाचे रूपांतर विवेकवादी माणसांमध्ये होते. ज्याला..
रॅशनल थिंकर म्हणतात!!
- Dr.Pradeep Patil